Latest Posts

ब्रम्हपुरीतील किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी अटकेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी विक्री प्रकरणात विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे याला कंबोडियात किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करणारा तथाकथित डॉ. कृष्णा अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सोलापुरात ही कारवाई करण्यात आली.  धक्कादायक बाब म्हणजे डॉ. कृष्णा हे नाव पूर्णतः बनावट असून आरोपीचे खरे नाव मल्लेश असून तो डॉक्टर नसून इंजिनिअर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आर्थिक अडचणींमुळे रोशन कुडे याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकली होती. फेसबुकवरील किडनी डोनर कम्युनिटी या पेजच्या माध्यमातून त्याचा एका व्यक्तीशी संपर्क झाला. संबंधित व्यक्तीने स्वतःला चेन्नई येथील डॉक्टर असल्याचे भासवून डॉ. कृष्णा या नावाने कुडे याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे दोघांमध्ये सातत्याने संपर्क सुरू होता.

कंबोडियाला जाण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर या दोघांची पहिली व शेवटची प्रत्यक्ष भेट झाली. किडनी विक्रीनंतरही काही काळ दोघांमध्ये संपर्क सुरू होता. दरम्यान, सावकारांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर तपासाची दिशा मानवी अवयव तस्करीकडे वळविण्यात आली असून या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठित करण्यात आले.

सात दिवसांपर्यंत तपासात ठोस माहिती हाती लागत नव्हती. मात्र, मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि सिमकार्डची माहिती मिळाल्यानंतर डॉ. कृष्णा हे नाव बनावट असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित क्रमांकाचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर आरोपी सोलापुरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाइव्ह लोकेशनच्या आधारे रविवारी २१ रात्री विशेष तपास पथकाने सोलापुरात छापा टाकून आरोपी मल्लेश याला अटक केली.

चौकशीत आरोपी मल्लेश हा मूळचा इंजिनिअर असून आर्थिक विवंचनेमुळे त्याने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र तोट्यात गेल्यानंतर त्याने स्वतःचीही किडनी विकल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर तो किडनी विक्री रॅकेटमध्ये एजंट म्हणून सक्रिय झाला असून परदेशात किडनी प्रत्यारोपणासाठी लोकांना नेण्याच्या बदल्यात त्याला कमिशन मिळत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे दाखल अपराध क्रमांक ६५४/२०२५ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले असून तपासादरम्यान The Transplantation of Human Organs and Tissues Act, १९९४ मधील कलम १८ व १९ही समाविष्ट करण्यात आले आहेत. आरोपीने फिर्यादी व्यतिरिक्त आणखी किती जणांना अशा प्रकारे फसवून कंबोडियासह इतर देशांत किडनी प्रत्यारोपणासाठी नेले, याचा सखोल तपास सुरू आहे.

यापूर्वी राजस्थान, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब तसेच बांगलादेशातील नागरिकांनीही कंबोडियात किडनी विकल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे आरोपीच्या अटकेमुळे किडनी विक्रीच्या देशव्यापी रॅकेटचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss