विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणा-या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व वाहनांना केंद्रिय मोटार वाहन नियमानुसार महाराष्ट्र राज्यातील १ एप्रिल २०१९ पुर्वी उत्पादित सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्टेशन नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहन धारकांनी वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्टेशन नंबर प्लेट बसवून घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी केले आहे.
यासाठी वर्धा जिल्ह्यासाठी अधिकृत फिटमेंट सेंटर्ससाठी मे रियल माझोन इंडिया लिमिटेड या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर एजन्सी कडून हाय सिक्युरिटी रजिस्टेशन नंबर प्लेट बसविण्याकरीता https://hsrpmhzone2.in या संकेतस्थळावर ऑनलाईन वेळ घेऊन नोंदणी करावी. व नंबर प्लेट बसवून घ्यावी. वाहनधारक उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त वर्धा जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्टेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.
नंबर प्लेट बसविण्याकरीता जीएसटी वगळून दूचाकी आणि ट्रॅक्टर करीता ४५० रुपये, तीन चाकी करीता ५०० रुपये व इतर सर्व वाहनांकरीता ७४५ रुपये आकारण्यात येणार आहे. वाहन धारकांना त्यांच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्टेशन नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकाच्या पोर्टलवर तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे तक्रार दाखल करु शकतात.
हाय सिक्युरिटी रजिस्टेशन नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अद्यावत इत्यादी संर्भातील कामे होऊ शकणार नाही. अशा वाहनांवर भविष्यात कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याची वाहन धारकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
