विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : राजुरा तालुक्यातील हरदोना (बुज) परिसरात राजस्थानातून आलेल्या तरुणाची तलवारीने हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकरावर पतीचा खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. राजेश नारायणलाल मेघवंशी (३०) असे मृतकाचे नाव आहे.
जगदीश नाथूलाल मेघवंशी (३६), रा. अरजिया, ता. भीलवाडा, राजस्थान हे आपल्या चुलत भावाचा शोध घेण्यासाठी आणि त्याची पत्नी दुर्गा उर्फ जिया हिच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी राजेश नारायणलाल मेघवंशी (३०) सोबत राजस्थानहून महाराष्ट्रात आले होते. राजेशची पत्नी दुर्गा हिला पाच–सहा महिन्यांपूर्वी चंद्रप्रकाश हरदेव मेघवंशी याने राजस्थानातून पळवून नेले होते. याबाबत राजेशने आपल्या गावात तक्रारही दाखल केली होती.
५ डिसेंबर रोजी सायंकाळी दोघेही हरदोना (बुज) येथील नारायण कटारिया यांच्या शेताजवळील घराजवळ पोहोचले. तेथे घरासमोर चंद्रप्रकाश दिसल्याने राजेशने पत्नीला का पळवून नेले असा जाब विचारला. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
त्याच वेळी चंद्रप्रकाशाने वरच्या मजल्यावर असलेल्या दुर्गाला आवाज दिला. दुर्गाने वरून खाली तलवार फेकली. ती हातात घेताच चंद्रप्रकाशाने राजेशच्या डोक्यावर जोरदार वार केला. गंभीर जखमी झालेल्या राजेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी उपस्थित असलेले जगदीश घाबरून पळून गेला. नंतर त्यांनी पोलिसांसह परत येऊन पाहिले असता राजेश मृत अवस्थेत आढळला.
