Latest Posts

गडचिरोली पोलीस शिपाई भरतीतील मैदानी चाचणी गुणांची यादी प्रसिद्ध

– ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार लेखी परीक्षेस पात्र

– आक्षेप नोंदविण्यास २४ तासांची मुदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई भरती २०२४ – २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मैदानी चाचणीतील उमेदवारांना प्राप्त गुणांची एकत्रित यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. १४ फेब्रुवारी २०२६ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. दररोजच्या गुणांची माहिती उमेदवारांसाठी प्रसिद्ध केली जात होती.

आता सर्व उमेदवारांची एकत्रित गुणांची यादी Gadchiroli Police यांच्या अधिकृत संकेतस्थळ www.gadchirolipolice.gov.in⁠� तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या २३ जून २०२२ च्या अधिसूचनेनुसार शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीबाबत कोणत्याही उमेदवारास आक्षेप असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून २४ तासांच्या आत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्षात प्रत्यक्ष हजर राहून किंवा अर्ज सादर करताना दिलेल्या ई-मेलवरून sp.gadchiroli@mahapolice.gov.in या ई-मेलवर आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदत संपल्यानंतर प्राप्त होणारे आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच कोणी प्रलोभन देत असल्यास ८८०६३१२१०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Latest Posts

Don't Miss