Latest Posts

गडचिरोली जिल्ह्यात विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी सुरू

विधर्भ न्यूज एक्स्प्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४ – २०२५ ते २०२८ – २०२९ या कालावधीत दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच शासनाच्या वतीने विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २(VMDDP) ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक दूध उत्पादक पशुपालकांना वेगवेगळ्या ९ प्रकारच्या घटकांचा आता लाभ घेता येणार आहे, तरी या योजनांचा लाभ घेण्यासाठी vmddp.com या
संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीसोबतच आता दुग्धव्यवसायास प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास आता जलतगतीने व्हावा व दुग्धव्यवसायास चालना मिळावी म्हणून शासनाने प्रथमतःच गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत येणारे घटक –

१. उच्च दुध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हैस वाटप ( ५० टक्के अनुदानावर)
२. उच्च उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या गाभण कालवडींचे वाटप ( ७५ टक्के अनुदानावर)
३. पशुप्रजनन पुरक खाद्य (Fertility Feed) चा पुरवठा ( २५ टक्के अनुदानावर)
४. दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक (Enhancing) खाद्य पुरकांचा पुरवठा (२५ टक्के अनुदानावर)
५. बहुवार्षीक चारा पिके घेण्यासाठी उच्च प्रतीचे वैरण बियाणे वाटप १०० टक्के अनुदानावर
६. विदयुत चलित कडबाकुट्टी सयंत्राचे वाटप ( ५० टक्के अनुदानावर)
७. ३ रुपये प्रती किलो अनुदानावर मुरघास वाटप
८. जिल्हाभरात पशुवैद्यकीय संस्थांच्या सहकायनि वंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
९. दुग्ध उत्पादक पशुपालकांना प्रगतिशील दुग्ध उत्पादकांच्या गोठ्यावर नियमित प्रात्यक्षिकांसह आधुनिक पद्धतीने दुग्धउत्पादन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार

ऑनलाइन अर्जाचे निकष –
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी, पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दोन दुधाळ जनावरे असावीत. त्यांची एन. डी. एल. एम. प्रणालीवर नोंद असणे आवश्यक आहे. किमान तीन महिने जिल्हा दूध संघ सहकारी दूध संकलन केंद्रावर किंवा खासगी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक असून तसे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रामध्ये –

१. अर्जदाराचे आधार कार्ड व मोबाइल क्रमांक
२. सात-बारा,
३. राशनकार्ड
४. दुग्ध उत्पादक प्रमाणपत्र
५. भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत दुधाळ जनावरांचे टॅग क्रमांक,
६. बँकेचे खाते पुस्तक ही कागदपत्रे
७. कुटुंबातील इतर सर्वांचे आधार क्रमांक हे अपलोड करणे आवश्यक आहे.

प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा किंवा संकेतस्थळावर भेट द्यावी. VMDDP.COM या संकेतस्थळावर भेट देऊन सर्व पात्र व इच्छुक दूध उत्पादक पशुपालकांनी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन डॉ. गणेश मेश्राम, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, गडचिरोली यांनी केले.

प्रकल्पाच्या योजनांबाबत अधिक माहिती व अर्ज भरण्याबाबतीत मार्गदर्शन यासाठी डॉ. मनोज मोतीलाल दोनाडकर, जिल्हा प्रकल्प अधिकारी, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा तसेच तालुक्यातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss