Latest Posts

निधी अप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारी आधार संमती व ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे  

– कृषी विभागाचे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : कृषी विभागाच्या सन २०२३ च्या खरीप हंगामातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत निधी प्राप्त झाला नाही, अशा खातेदारांनी आधार संमती व ना- हरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत कृषी विभागाकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येते. यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पीक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, असे खातेदार वनपट्टेधारक खातेदार व जिवती तालुक्यातील संगणकीकरण नसलेल्या मधील खरीप २०२३ कापूस/सोयाबीन उत्पादक वैयक्तीक व सामाईक खातेदार पात्र आहेत.

पात्र शेतकऱ्यांनी ई-पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याबाबत www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहायक यांच्यकडून खातरजमा करून घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांनी व जिवती तालुक्यातील Non Digitalised Villages  मधील कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांचेशी संपर्क साधावा. तसेच वनपट्टेधारक खातेदार यांनी तहसील/जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

तरी वर नमूद केल्याप्रमाणे अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधारसंमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र नमूना कृषि सहाय्यक यांचेकडे उपलब्ध आहे. विहीत मूदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागास प्राप्त न झाल्याने लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी नजिकच्या उपविभागीय कृषि अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss