– बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): बल्लारशाह – गोंदिया रेल्वे रुळावर तसेच भद्रावती व वरोरा परिसरात एका दिवसात तीन वन्यजीवांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ४१३ मध्ये चंद्रपूरकडे येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच्या धडकेत एका मादी सांबराचा मृत्यू झाला. तर भद्रावती हायवेवर पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळाचा आणि वरोरा येथे आनंदवन चौकाजवळ हायवेवर साळिंदराचा मृत्यू झाला.
बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्ग हा वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत असून आजवर या रुळावर १६ वन्यजीवांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी दिली.
घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे दिनेश खाटे, नाजिश अली, अमित देशमुख, अभिषेक गजभे, यश सोनुले, अंकित बाकडे तसेच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनलकर, वनरक्षक स्वामी आणि वनमजूर उपस्थित होते.
आता पर्यंत रेल्वे अपघातात २ वाघ, १ बिबट, ३ अस्वल, १ रानगवा, ६ सांबर, १ चितळ, १ हुमा घुबळ, १ बंदर यांचा समावेश आहे. तसेच राजुरा परिसरात एका वाघाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण संख्या १७ वर पोहोचली आहे.
या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना राबविण्यासाठी बल्लारशाह – गोंदिया रेल्वेरुळावर उपशमन योजना लागू करण्याबाबत नागपूर हायकोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. हा मार्ग कावल व्याघ्र प्रकल्प – कन्हाळगाव अभयारण्य–ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प – उमरेड – कऱ्हाण्डा अभयारण्याच्या महत्त्वाच्या वन्यजीव भ्रमणमार्गातून जात असल्याने उपशमन योजना तातडीने लागू करण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी भारतीय रेल्वेतर्फे काही ठिकाणी बेकायदेशीरपणे कुंपण घातले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अंडरपास, नॉइज बॅरियर्स, लाईट बॅरियर्स, रबराइज्ड मॅट्स, इलेक्ट्रोमॅट्स, घुसखोरी शोध प्रणाली यांसारख्या प्रभावी उपायांकडे दुर्लक्ष केल्याने वन्यजीवांचे जीव जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या शिफारसी रेल्वे मंत्रालयाने लवकरात लवकर लागू कराव्यात, अशीही मागणी पर्यावरणप्रेमींनी केली.
