विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्यात प्रधानमंत्री पिक विमा २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप २०२३ हंगामापासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पिक विमा योजना देऊ केली आहे. याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये सहभाग नोंदणी सुरू आहे. केंद्र सरकारचे पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in हे विमा योजनेत भाग घेण्यासाठी कार्यान्वित आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी सदर मुदत ३१ मार्च २०२५ आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते. चालू वर्षी ११ डिसेंबर २०२४ अखेर राज्यात ४१ लाख विमा अर्ज दाखल झाले आहेत.
पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांना १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत असल्याने या पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. राज्य शासनामार्फत या हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पिक विमा योजना देऊ केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा असे आवाहन कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे.
