विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : १९ व २० व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचा पाया हा जातिव्यवस्था, वर्ण व वर्गव्यवस्था व पुरुषप्रधान संस्कृती असा होता. त्यामुळे आपला समाज जातिव्यवस्थेने निर्माण केलेली व्यवसायबंदी, शूद्र-अतिशूद्रांना लादलेल्या ज्ञानबंदीतून निर्माण झालेली सामाजिक आणि शैक्षणिक विषमता व अंधश्रद्धा ह्यात गुंतलेला होता. त्या विषम परिस्थितीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल जीवन घालले. आणि फुले, शाहू व आंबेडकर यांच्या कार्यातूनच सामाजिक विषमता दूर होण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांचे योगदान अमूल्य आहे. असे प्रतिपादन भाग्यश्री आत्राम यांनी केले.
मिलिंद बहुउद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सांस्कृतिक परिवर्तन दिवसाच्या निमित्याने २४ व २५ डिसेंबर ला घेण्यात आलेल्या फुले, शाहू आंबेडकर वार्षिक उत्सवाचे ध्वजारोहण माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी नगर सेवक रवी रालबंडीवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष मदनय्या मादेशी, एम.डी. शाणू, रवी सुल्तान, देवय्या येनगंदुला, सिद्दिक, नगरसेवक नरेश अलोने आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या उत्सवात परिवर्तन रॅली, परिसंवाद, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, भीम गीत कार्यक्रम तसेच कव्वालीचा मुकाबला घेण्यात आला.
