विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : दिल्ली स्फोटाशी निगडीत मनी लॉंड्रिंग प्रकरणात नाव आल्याचे खोटे सांगत सायबर गुन्हेगारांनी एका ७१ वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याला जाळ्यात ओढून तब्बल २९ लाख रुपये लुबाडले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधवनगरात राहणाऱ्या वृद्धाला ११ नोव्हेंबर रोजी ८९२२०६३२३५ या क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. कॉलवरील व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलीस मुख्यालयातील उपनिरीक्षक सुमित मिश्रा म्हणून ओळख दिली. दिल्लीतील स्फोट प्रकरणाशी संबंधित मनी लॉंड्रिंगमध्ये तुमचे नाव असल्याचे खोटे सांगत त्याने वृद्धावर मानसिक दडपण आणले. काही वेळातच दुसरा व्हिडीओ कॉल येऊन कॅमेरा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सहकार्य न केल्यास अटक केली जाईल, अशी धमकी देण्यात आली.
११ ते २१ नोव्हेंबरदरम्यान सतत पती-पत्नीच्या मोबाईलवरून येणारे व्हिडीओ कॉल, दिल्ली-एनआयए व लखनऊ एटीएसमधून बोलत असल्याचे दावे, मालमत्तेबाबत सविस्तर चौकशी यामुळे वृद्ध दहशतीत आला. आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचा बनावट अटक वॉरंटही पाठवला. भितीपोटी वृद्धाने एफडी मोडून २९.३० लाख रुपये आरोपींना पाठविले. तरीही आरोपींची पैशांची मागणी सुरूच राहिली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर मालमत्ता किंवा पेन्शनवर कर्ज घेण्याचा सल्ला देण्यात आला.
यानंतर अचानक कॉल येणे बंद झाले. पैसे परत मिळण्याबाबत विचारले असता २४ नोव्हेंबरला परत देऊ असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही कोणताही संपर्क झाला नाही. अखेर वृद्धाने हा प्रकार बाहेरगावी राहणाऱ्या मुलाला सांगितला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलीसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून वृद्धाने पाठविलेल्या रकमेसंदर्भातील मनी ट्रेल काढण्यास सुरुवात केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत आहे.
