विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजने अंतर्गत रु.५ हजार प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे असे खातेदार, खरीप २०२३ कापूस/ सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार खरीप २०२३ कापूस / सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत. पात्र शेतकऱ्यांनी ई- पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असलेबाबत खातरजमा www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडून करुन घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांनी खरीप २०२३ कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांचेशी संपर्क साधावा. खरीप २०२३ कापूस/सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार यांनी तहसिल/जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
तरी वर नमूद केल्याप्रमाणे सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधार संमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्राचा नमूना कृषि सहाय्यक यांचेकडे उपलब्ध आहे. विहीत मुदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषि विभागास प्राप्त न झाल्याने लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी नजिकच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी/उपविभागीय कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली, प्रिती.म. हिरळकर यांनी कळविले आहे.
