Latest Posts

चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर खाजगी बस पलटी : ४० प्रवासी, ३ गंभीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): चंद्रपूरवरून गडचिरोलीकडे जाणारी के. जी. एन. कंपनीची खाजगी बस क्रं एम.एच. ०४ बी.जी. १७३६ सावली तालुक्यातील हिरापूर टोलनाक्याजवळ आज दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास पलटी होऊन अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करीत होते. अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. इतर जखमी प्रवाशांवर प्रथम सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. काही प्रवाशांची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयातही हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हिरापूर टोलनाक्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांनीही मदतकार्य करत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात पोहोचविण्यास सहकार्य केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी गोंदिया येथील आपला दौरा अर्धवट सोडून गडचिरोली जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच प्रशासनाला जखमींवर तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

या अपघातामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची पुढील चौकशी सुरू केली आहे.

Latest Posts

Don't Miss