विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी गंभीर घटना घडली आहे. गौवंश तस्करीविरोधात कारवाई करीत असलेल्या ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्यावर एका युवकाने हल्ला करून मारहाण केली. या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० व २१ जानेवारीच्या मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजताच्या सुमारास रेल्वे पटरीजवळ, पाटण मार्गावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचांदूर पोलीस २० जानेवारीच्या रात्री एमएच ३४ बीझेड ७१९४ क्रमांकाच्या ट्रकमधून गौवंश कत्तलखान्या कडे नेत असल्याच्या संशयावरून कायदेशीर कारवाई करीत होते. याचवेळी गडचांदूर येथील वार्ड क्रमांक ५ मधील रहिवासी सूरज रामभवन पांडे (वय ३२) हा घटनास्थळी आला. त्याने पोलिसांवर गंभीर आरोप करत, तुम्ही सेटिंग करून ट्रक सोडून द्याल, असे म्हणत वाद घातला व मला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका, अशी धमकी दिली.
वाद वाढताच आरोपीने ऑन ड्युटी पोलिस कर्मचारी बलवंत रोशनलाल शर्मा यांचे कॉलर पकडून त्यांच्या छातीवर घूंसा मारला व त्यांना खाली पाडले. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. शर्मा यांच्या सहकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या गंभीर घटनेनंतर पीडित पोलिस कर्मचारी बलवंत शर्मा यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपी सूरज पांडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२१(१), १३२ व ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा सखोल तपास ठाणेदार स्वप्निल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
