विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : शैक्षणिक सत्र सन २०२४- २०२५ या वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते, याबाबत महाविद्यालयास इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणारे व पॉलीटेक्नीक तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी करीता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. ही मुदत आता २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात येत आहे.
महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देणे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम २०१२ मधील नियम १८ (५) अन्वये जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला ३ महिन्याचे आत जास्तीत जास्त २ महिन्याचा जास्तीचा कालावधी अशा ५ महिन्यात निर्णय घ्यावा लागतो. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याचा कालावधी जुलै, ऑगस्ट व सप्टेबर असा असून व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश प्रक्रियेपूर्वी विद्यार्थ्यांकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास त्यांना सामाजिक आरक्षणांतर्गत प्रवेश मिळणार नाही. त्याकरीता अर्जदारांचे अर्ज ६ महिन्यापूर्वी समिती कार्यालयाकडे प्राप्त होणे आवश्यक आहे. जेणे करुन अर्जदाराचे प्रवेश प्रक्रियेपूर्वी त्यांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करता येतील व कोणताही विद्यार्थी लाभापासून वंचीत राहणार नाही.
कार्यालयात येणारे अर्जदारांची संख्या पाहता व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या करीता इयत्ता बारावी विज्ञान व पॉलीटेक्नीक तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना १ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधी पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे अर्ज १ मार्च २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत स्विकारण्यात येतील. दिलेल्या वेळेपत्रकानंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत व त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसानीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखडे यांनी कळविले आहे.
