विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): शहरालगतच्या कारवा जंगल रोडवर आज सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास सिमेंटने भरलेला आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात ट्रकचा वाहक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहन क्रमांक एमएच ३३ डब्ल्यू ०३३० हा आयशर ट्रक दालमिया सिमेंट कंपनीचे सिमेंट घेऊन गडचिरोली कडे जात होता. कारवा जंगल रोडवरून जात असताना अचानक ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
अपघाताची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी वाहकाला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
अपघातामुळे काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती. पुढील तपास सुरू आहे.
