विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : अर्थमंत्री भारत सरकार यांनी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय भाषणात पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) जाहीर केली. हि योजना पुढील पाच वर्षासाठी रू. ६३ हजार कोटींच्या अंदाजित खर्चासह देशातील टॉप ५०० कंपन्यामध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविली जात आहे. हि योजना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत कार्यान्वित केली जात आहे. पुढील पाच वर्षात एक कोटी तरूणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी टॉप ५०० कंपन्यामध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उददेश आहे.
या योजनेमध्ये कंपन्या, कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (CSR) उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या आहेत. प्रत्येक इंटर्नसाठी वार्षिक रू. ६६ हजार देण्यात येणार आहे. दरमहा रू. ५ हजार आर्थिक सहाय्य दिले जाईल. ज्यामध्ये कंपनी त्यांच्या CSR निधीतुन रू. ५०० देईल आणि भारत सरकार रू. ४ हजार ५०० देईल. जॉईनिंगच्या वेळी उमेदवारांना रू. ६ हजार इतके एकरकमी अनूदान दिले जाईल. भारत सरकार प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत प्रवेश प्रशिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील प्रदान करत आहे. पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगारात नसलेले बेरोजगार तरूण या योजनेसाठी पात्र आहे. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रू. ८ लाखांपेक्षा जास्त नसावे किंवा कुटूंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. सामाजिक आणि आर्थिक संसाधनापासून दूर असलेल्या युवकांना मदत करण्याचा उददेश आहे. २१ ते २४ वयोगटातील तरूणांना प्रशिक्षित करणे आणि कमी रोजगारक्षम असलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कौशल्याधारित कार्याचा अनूभव देणे हा योजनेचा मुख्य उददेश आहे.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने योजनेच्या व्यवस्थापनासाठी https://pminternship.mca.gov.in हे विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे कंपन्या आणि तरूणांना नोंदणी करण्याची व एकमेकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. तसेच, सरकारद्वारे थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे आर्थिक सहाय्य वितरीत केले जाईल. उमेदवार ३१ मार्च २०२५ पर्यंत या संधीसाठी अर्ज करू शकतात. त्यांनतर पोर्टल उमेदवारांच्या प्रोफाईलनुसार संधी जुळवेल आणि कंपन्यांनी निवडलेल्या अर्जाची माहिती उमेदवारांना मिळेल.
तरी जास्तीत जास्त पात्रताधारक उमेदवारांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांनी केले आहे.
