विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : ब्रम्हपुरी- नागभीड मार्गावर उराडे राईस मिलजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना ८ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. गणेश तुपट असे मृताचे नाव आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापूर येथील गणेश मन्साराम तुपट (२३) हा त्याच्या आई- वडिलांसोबत राहत असून रामदेवबाबा सॉल्व्हेंट उदापूर येथे कामाला होता. ८ जानेवारी रोजी सकाळी ते आपली दुचाकी क्र. एमएच ३४ बीसी ८४२९ ने रामदेवबाबा सॉल्व्हेंट येथे कामावर जात असताना नागभीडकडून ब्रम्हपुरीच्या दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३१ एफसी ३७२९ ची समोरासमोर धडक झाली. दुपारी १२ वाजता मृत गणेशचा चुलत भाऊ श्रीहरी मुरलीधर तुपट याला माहिती मिळाली. त्या आधारे श्रीहरी तुपट हा उराडे राईस मिलजवळ पोहोचले आणि चुलत भाऊ गणेशला घेऊन ब्रम्हपुरी शासकीय रुग्णालयात दाखल झाले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यामुळे श्रीहरी यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्या आधारे पोलिसांनी ट्रक क्र. एमएच ३१ एफसी ३७२९ च्या चालकावर मोटारवाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४,२८१, १०६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बालाजी चौहान तपास करीत आहेत.
