विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia): भरधाव वेगात धावणाऱ्या टिप्परने दिलेल्या जोरदार धडकेत सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम तेढवा येथील चौकात शनिवारी (३) सायंकाळी घडली. या अपघातात शोभेलाल पटले (६०, रा. तेढवा) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शोभेलाल पटले हे सायकलने गावातील मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी जात होते. त्याचवेळी टिप्पर क्रमांक एमएच ३५–एजे ९०९१ च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित सायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वृद्ध रस्त्यावर कोसळले.
या अपघातात शोभेलाल पटले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या प्रकरणी शिपाई मनोज पटले यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत.
