Latest Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यत मुदतवाढ

– बँक तपशील भरण्यासाठी टॅब उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२४-२५ साठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १५ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यानी http://hmas.mahait.org या पोर्टलवर बँक तपशील तात्काळ भरुन घ्यावा. जे विद्यार्थी बँक तपशील भरणार नाहीत ते लाभापासून वंचित राहिल्यास ते स्वत: जबाबदार राहतील. अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज भरला नाही त्यांनी १५ मार्च २०२५ पर्यत ऑनलाईन पोर्टलवर भरुन प्रिंट काढून महाविद्यालयातील समान संधी केंद्रात ७ दिवसांच्या आत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये १३ जुन २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

२६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यत वाढविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणार शैक्षणिक सत्र व नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीत येणाऱ्या अडचणी संदर्भात विविध विद्यार्थी संघटनाच्या मुदतवाढीच्या मागणी निवेदनाच्या अनुषंगाने आयुक्तालयाचे ४ मार्च २०२५ च्या परिपत्रकानुसार स्वाधारसाठी पात्र विद्यार्थ्यांस अर्ज करण्यासाठी १५ मार्च २०२५ अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापुर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यासाठी बँक तपशील भरण्याबाबतचा ऑनलाईन पोर्टलवर टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

Latest Posts

Don't Miss