विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (bhandara): महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा यांच्या वतीने नव तेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. २७ ते २९ मार्च २०२५ या कालावधीत आर.एस.ई.टी.आय, शास्त्री चौक, भंडारा येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांनी तयार केलेली विविध उत्पादने उपलब्ध असतील. यामध्ये सिल्क साडी, एम्ब्रॉयडरी साडी, कोसा वर्क, काथा वर्क, लेडीज बॅग, चप्पल, ज्वेलरी, तसेच विविध खाद्यपदार्थ लोणची, मुरंबा, पापड, मसाले इत्यादींचा समावेश असेल.
भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन उत्कृष्ट व दर्जेदार वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपव्यवस्थापकांनी केले आहे.
