– वैद्यकीय अधिकारी महासंघ शाखा गडचिरोली
– २४ वर्षापासून पदोन्नती रखडली
– वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : राज्याच्या आरोग्य विभागातील सावळागोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच शासन सेवेतील वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ यांची गेल्या २३ वर्षांपासून पदोन्नती रखडली आहे. वैद्यकीय अधिकारी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु त्यांना ‘तारीख पे तारीख’ शिवाय काही मिळाले नाही. यामुळे आता वैद्यकीय अधिकारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आजवर विधानसभेत डझनभर तारांकित प्रश्न व लक्षवेधी, शेकडो आमदार, खासदार मंत्री यांची पत्रे, वृत्तपत्रातील बातम्या यांना शासनाने केराची टोपली दाखवली आहे. कार्यवाही सुरू आहे असे उत्तर लोकप्रतिनिधी देवून यांचीदेखील दिशामूल केली जात आहे. ह्या लोकांना सेवा हमी कायदा लागू नाही का? कुठल्याही विभागात ठराविक कालावधीनंतर पदोन्नती देण्याची व्यवस्था आहे, पण आरोग्य विभागाला याचा सोयीस्करपणे विसर पडलेला आहे असे दिसून येते.
राज्याच्या १६ आदिवासी बहुल जिह्यासह दुर्गम, अतिदुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त भागात व राज्याच्या कानाकोपऱ्यात शेवटच्या नागरिकांपर्यंत अविरत आरोग्यसेवा देण्याचे कार्य वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ करतो आहे. त्यात नियमित बाह्यरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा, श्वानदंश, सर्पदंश, अपघात रुग्ण, आकस्मिक सेवा, गरजेनुसार पोस्टमार्टम, प्रसूती सेवा आदी सेवा अटीतटीच्या काळात हाच संवर्ग देत असतो. यासोबतच लसीकरण, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्मान भारत कार्ड योजना आदींचे नियोजन हाच संवर्ग करतो. जेव्हा केव्हा आरोग्य विषयक आपातकालीन व आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा गट ‘ब’ वैद्यकीय अधिकारी यांची आठवण शासनाला येते.
मात्र सेवाविषयक लाभ देतांना चालढकल केली जाते. बरेच वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीचा लाभ न घेताच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ यांच्यामध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
सदर सेवाज्येष्ठता यादी तत्काळ प्रसिद्ध करावी व पदोन्नती द्यावी, अशी मागणी वैद्यकीय अधिकारी महासंघामार्फत करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे.
