Latest Posts

नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई : एलसीबी ने २.०४ लाखांचा साठा केला जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि मानवी जीवितासह पर्यावरणासाठी गंभीर धोका ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने धडक कारवाई करत २ लाख ४ हजार रुपयांचा साठा जप्त करत दोन आरोपींना अटक केले.

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी राबविली. यावेळी मोटारसायकलवरून नायलॉन मांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या १३७ प्लास्टिक चक्री तसेच वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजेश खुशाल वेस्कडे (वय ३२), रा. बियाणी पेट्रोल पंपाजवळ, चंद्रपूर व सौरभ लहानू वाढई (वय २६) , रा. बिनबा गेटजवळ, चंद्रपूर अशी आहेत. चौकशीत सदर नायलॉन मांजा हा गौरव गोटेफोटे (रा. चंद्रपूर) याच्याकडून आणल्याचे समोर आले असून, त्यानुसार पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक ३६/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २९२, ४९ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ५ व १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा जयसिंग, सचिन गुरनुले, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, पोअं सुमीत बरडे यांनी केले.

Latest Posts

Don't Miss