Latest Posts

४५ वर्षांवरील जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचा मानाचा विजय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): राजुरा हेल्थ क्लब, राजुरा यांच्या वतीने प्रौढांच्या जिल्हास्तरीय मैत्रीपूर्ण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि. १ मार्च २०२६ रोजी अंगद नगर, निलगिरी प्लांट, बामणवाडा (ता. राजुरा) येथे करण्यात आले. ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १२ संघांनी उत्साहाने सहभाग घेतला.

स्पर्धेत बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर, जिवती, भद्रावती आदी भागांतील संघ सहभागी झाले होते. अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गडचांदूर स्पोर्टिंग क्लबने द्वितीय क्रमांक मिळवला, तर क्रीडा संकुल भद्रावती संघाने तृतीय क्रमांकावर समाधान मानले.

चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आवते यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर संघाने विजेतेपद संपादन केले. विजेत्या संघात श्रीनिवास उन्नाव, मनोज सेंगर, परमेश्वर बोटला, प्रा. युवराज बोबडे, प्रा. विजय कुलकर्णी, अंकुश चव्हाण, शांताराम वाडगुरे, संभाजी कोंडेवाड, रमेश सुखदेवे, प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर, पंडित गावडे आदी खेळाडूंचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत बामणवाडा सरपंच सौ. भारती जगदीश पाल, नायब तहसीलदार राजुरा शेखर तेलंग, ग्रामपंचायत सदस्य सर्वानंद वाघमारे तसेच राजुरा हेल्थ क्लबचे अध्यक्ष प्रदीप वांढरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी ४५ वर्षांवरील पुरुषांसाठी अशा स्पर्धांचे नियमित आयोजन व्हावे, असे मत व्यक्त केले. आपण स्वतः व्हॉलीबॉल खेळाडू असल्याचे सांगत पुढील वर्षी स्वतःचा संघ उतरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अशा मैत्रीपूर्ण सामन्यांमुळे सर्वांचे आरोग्य सुदृढ राहून परस्परांतील मैत्रीभाव अधिक दृढ होतो, असे त्यांनी नमूद केले.

Latest Posts

Don't Miss