Latest Posts

आधार कार्ड ला आता जन्मतारखेचा पुरावा मानले जाणार नाही : ईपीएफओ चा मोठा निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : EPFO ​​ने आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता जन्मतारीख अपडेट किंवा दुरुस्त करण्यासाठी आधार कार्ड वापरता येणार नाही. ईपीएफओने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड वगळले आहे.

या संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक परिपत्रकही जारी केले आहे.

ईपीएफओने काय म्हंटले आहे परिपत्रकात –
श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या EPFO ​​ने म्हंटले आहे की, आधार कार्डचा वापर करुन जन्मतारीख बदलता येणार नाही. ईपीएफओने १६ जानेवारीला हे परिपत्रक जारी केले. त्यानुसार UIDAI कडून एक पत्रही प्राप्त झाले आहे. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, जन्मतारीख बदलण्यासाठी आधार कार्ड वैध असणार नाही. वैध कागदपत्रांच्या यादीतून काढून टाकावे. त्यामुळे जन्म तारखेच्या पुराव्यासाठी आता आधार कार्डचा वापर केला जाऊ शकणार नाही.

जन्म प्रमाणपत्रासह ही कागदपत्रे आवश्यक –
ईपीएफओच्या मते, जन्म प्रमाणपत्राच्या मदतीने हा बदल केला जाऊ शकतो. याशिवाय कोणत्याही सरकारी मंडळाकडून किंवा विद्यापीठाकडून मिळालेले मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा बदलीचा दाखलाही वापरता येईल. त्यात नाव व जन्मतारीख नमूद असावी. याशिवाय सिव्हिल सर्जनने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन क्रमांक, सरकारी पेन्शन आणि मेडिक्लेम प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्राचा वापर करता येईल.

ओळख आणि रहिवासी प्रमाणपत्र म्हणून आधारचा वापर –
UIDAI ने म्हटले आहे की, आधार कार्डचा वापर ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र म्हणून केला जावा. परंतु, त्याचा जन्म प्रमाणपत्र म्हणून वापर करू नये. आधार हे १२ अंकी युनिक ओळखपत्र आहे. ते भारत सरकारने जारी केले आहे. तुमच्या ओळखीचा आणि कायम निवासाचा पुरावा म्हणून ते देशभर वैध आहे. मात्र, आधार बनवताना त्यांच्या विविध कागदपत्रांनुसार त्यांची जन्मतारीख टाकण्यात आली आहे. त्याला जन्म दाखल्यासारखे मानू नये.

न्यायालयाकडूनही सूचना –
विविध न्यायालयांनी आधार कायदा २०१६ वर अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे. अलीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की आधार क्रमांक जन्म प्रमाणपत्र म्हणून नव्हे तर ओळखपत्र म्हणून वापरला जावा. यानंतर UIDAI ने २२ डिसेंबर २०२३ रोजी एक परिपत्रक जारी केले होते.

Latest Posts

Don't Miss