विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पडोली पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. अल्पवयीन मुलीवर चक्क अल्पवयीन मुलानेच अत्याचार केल्याची घटना समोर येताच समाजमन सुन्न झाले.
पडोली परिसरात अनेक कुटुंबे विटा तयार करण्यासाठी मुक्कामी राहतात. कामाचे ठिकाण असलेल्या स्थळापासून काहीशा अंतरावर कामगारांची राहण्याची घरे आहेत. शुक्रवारी अल्पवयीन मुलीचे आईवडील विटा बनविण्यासाठी कामावर गेले. दरम्यान, एक नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीचा आवाज ऐकू आल्यामुळे तिचे आई- वडील घरी धावत आले. पीडित मुलीने झालेली घटना पालकांना सांगितली. त्यांनी पडोली पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी अॅट्रॉसिटी, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
मोबाईल मुळे घटनेत वाढ –
आपला पाल्य मोबाइलचा किती वापर करतो, तो त्यावर काय सर्च करतो, याबाबत पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी जनजागृतीसह पालकांनीही लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या घटनेत तो अल्पवयीन मुलगा मोबाइलचा अतिवापर करीत असल्याची माहिती आहे.
