– जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अन्नू वरारकर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २०२४-२५ पासून गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळांमधील गाईच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति देशी गाय ५० रुपये अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी भंडारा जिल्ह्यातील गोशाळांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अन्नू वरारकर यांनी केले आहे.
या योजने अंतर्गत अनुदान पात्रतेच्या अटीनुसार जिल्ह्यातील गोसंगोपनाचा किमान ३ वर्षे अनुभव असलेल्या गोशाळेत किमान ५० गोवंश व संस्थेतील ईअर टॅगिंग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले तसेच गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.
महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यालयाकडे थेट प्रस्ताव सादर केलेला तसेच ई-मेल अथवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. या योजनेचा उद्देश व स्वरूप, अनुदान पात्रतेच्या अटी व शर्ती, योजनेची अंमलबजावणी, योजनेचा ऑनलाइन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे आदीबाबतची माहिती www.mahagosevaaayog.org या संकेतस्तळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या निकषात पात्र असणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अन्नू वरारकर यांनी केले आहे.
