विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे राज्य शासनातर्फे युवक युवतींकरीता १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत एसएसडी कोर्स क्रमांक ६४ चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारीपदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १० डिसेंबर रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्च करुन एसएसबी ६४ कोर्ससाठी व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
प्रशिक्षणाकरीता इच्छुक उमेदवार कंबाईड सर्विसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेला असावा. व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा. एनसीसी (सी) सर्टीफिकेट ए किंवा बी ग्रेड पास झालेला असावा व एनसीसी ग्रूप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापिठ प्रवेश योजनेसाठी एसएसबी कॉल लेटर असलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com या ईमेल वर तसेच २५३-२४५०३२ या दुरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५६०७३३०६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.
