– २८ ऑगस्ट पर्यंत आक्षेप मागविले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा(Wardha) : ग्रामीण व नागरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी तसेच नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात आपले सेवा केंद्र उपयुक्त ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी आपले सेवा केंद्र सुरू करणाऱ्या इच्छुकांकडून ८ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची पडताळणी करुन आपले सेवा केंद्राची प्रारुप निवड यादी Wardha.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यात २५८ आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी २३२ आपले सेवा केंद्राची प्रारुप निवड यादी Wardha.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून आपले सेवा केंद्राची प्रारुप निवड यादीवर आक्षेप, हरकती असल्यास २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनात प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी स्वरुपात अर्ज दाखल करावा. प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकरण करुन अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतल्या जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
