Latest Posts

जुन्या वादातून कळमना येथे तरुणावर जीवघेणा हल्ला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballapur): जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर कड्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना कळमना येथे घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी कुणाल गजानन बरडे (वय २६), रा. कळमना ता. बल्लारपूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी बबन बापूजी उपरे (वय ५३), रा. कोर्टी मक्ता ता. बल्लारपूर हे शेती व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा सुरेश उपरे हा फायरब्रिगेड पेपर मिलमध्ये ठेकेदारी तत्वावर काम करतो. ६ मे रोजी सुरेश हा मित्राच्या लग्नासाठी कळमना येथे गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते.

दरम्यान, रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांना आशिष बावणे यांनी फोन करून तुमच्या मुलाला बरडेचा मुलगा मारत आहे, तातडीने कळमना येथे या, अशी माहिती दिली. त्यानंतर बबन उपरे व त्यांचे बंधू गोविंदा उपरे हे तातडीने कळमना येथे पोहोचले. तेव्हा स्थानिक नागरिकांकडून सुरेशला कळमना येथील रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली.

रुग्णालयात पोहोचल्यावर सुरेश उपरे हा गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. जखमी सुरेशने वडिलांना सांगितले की, जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी कुणाल बरडे याने कळमना येथील तलाठी कार्यालयासमोर कड्याने नाक व डोक्यावर वार करून मारहाण केली.

प्राथमिक उपचारानंतर सुरेश उपरे याला बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.

या घटनेमुळे कळमना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून बल्लारपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शब्बीर शेख करीत आहेत.

Latest Posts

Don't Miss