– शासनाचा संस्थेचा उपक्रम : मिळणार रोजगाराची दिशा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक – युवती व इतर उमेदवार इत्यादींचा विकास घडवण्यासाठी Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (Amrut ) ‘अमृत’ अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या स्वायत्त संस्थेद्वारे विविध क्षेत्रात ड्रोन वापरण्याचे मोफत प्रशिक्षण योजना ही योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सदरील कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना १० दिवसांचे डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन (ड्रोन) पायलट परवाना मिळणार आहे. या परवान्यामुळे कृषी, सर्वेक्षण, बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण आणि चित्रफीत निर्मिती अशा विविध क्षेत्रांत नोकरी आणि व्यवसायाचे दरवाजे खुले होतील.
विविध अभ्यासक्रमांचा समावेश –
सदरील प्रशिक्षणात एकूण आठ प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये मध्यम व लघु वर्गातील ड्रोन प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, कृषी व आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा वापर, नकाशांकन व सर्वेक्षण, ड्रोन देखभाल-दुरुस्ती आणि छायाचित्रण व चलचित्र निर्मिती यांचा समावेश आहे. प्रत्येक तुकडीमध्ये १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. हे प्रशिक्षण पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, रायगड, कोल्हापूर आणि परभणी येथील केंद्रांवर आयोजित केले जाणार आहे.
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया –
खुल्या प्रवर्गातील ज्या समाजांना इतर कोणत्याही शासकीय महामंडळाकडून योजनांचा लाभ मिळत नाही, ते या योजनेसाठी पात्र आहेत. यामध्ये ब्राह्मण, बनिया, कोमटी, सिंधी, मारवाडी, गुजराथी, पटेल, पाटीदार, राजपूत, राजपुरोहित, कायस्थ, नायर, नायडू, बंगाली, ठाकूर, त्यागी, जाट, कम्मा, कानबी, ऐयांगर, बेलमार, सेनगुनयर या जातीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती, विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय १८ ते ४५ वर्षांदरम्यान असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि तो किमान दहावी उत्तीर्ण असावा.
चौकट १: या ठिकाणी करावा अर्ज –
इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा अथवा अधिक माहिती करिता अमृत चे भंडारा जिल्हा व्यवस्थापक ओमकार मिलिंदराव हरदास यांना ९११२२२८७७५, ८८५७९३४७३२ या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. अर्जाची छापील प्रत, ओळखपत्र, अधिवास व उत्पन्नाचा दाखला, फिटनेस प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रांसह भंडारा मधील स्वीट होम, किराणाघर च्या बाजूला, शास्त्रीनगर, स्टेशन रोड, भंडारा येथील अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी. जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी पुढील तुकडीसाठीही नोंदणी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
