विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी गहू, तांदूळ, डाळी तसेच इतर खरीप, रब्बी आणि झैद पिकांच्या उत्पादन वाढीसाठी लक्ष्य निश्चित केले आहे. तसेच निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्य सरकारांना उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
केंद्राने तीनही हंगामात तांदळाचे एकूण १ हजार ३६३ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच गव्हासाठी १ हजार १५० लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तेलबिया, धान्ये आणि इतर पिकांच्या उत्पादनासाठीही उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२४-२५ या वर्षासाठी अन्नधान्य, तेलबिया आणि व्यावसायिक पिकांसाठी सुधारित उत्पादन लक्ष्य निश्चित केले आहे. या पिकांमध्ये तांदूळ, गहू, बाजरी, मका, नाचणी, भरडधान्ये आणि कडधान्यांसह मूग, उडीद, हरभरा, मसूर, तेलबिया यासह भुईमूग, सोयाबीन, मोहरी, सूर्यफूल आणि इतरांचा समावेश आहे. व्यावसायिक पिकांमध्ये ऊस, कापूस आणि ताग या पिकांचे उत्पादन उद्दिष्ट सुधारित हंगामानुसार निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे, ते म्हणाले की, आम्ही २०२४-२५ साठी ३ हजार ४१५.५ लाख टन (३४१.५५ दशलक्ष) अन्नधान्य उत्पादनाचे राष्ट्रीय लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतीचे विविधीकरण आणि क्षेत्र वाढवण्याबरोबरच विविध पद्धतींचा अवलंब करण्यात येणार आहे. देशाला डाळी आणि तेलबियांमध्ये स्वावलंबी करण्याचा संकल्प आम्ही सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मिनी किट देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कृषी विकासासाठी सुरू केलेल्या योजनांचा राज्यांना योग्य प्रकारे लाभ घेता यावा यावर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारांना कृती अहवाल तयार करण्याचे आदेश –
केंद्राने सर्व राज्य सरकारांना उद्दिष्ट गाठण्यासाठी धोरण आखण्याची विनंती केली आहे. यासोबतच लक्ष्य अहवाल (ATR) साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती कृषी मंत्रालयाला देण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाची खते, बियाणे आणि उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.
मका, कडधान्ये आणि तेलबियांचे लक्ष्य –
केंद्राने २०२४-२५ या वर्षासाठी सर्व हंगामात १ हजार ३६३ लाख टन तांदूळ उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर गव्हासाठी १ हजार १५० लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर मक्यासाठी ४०० लाख टन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १८१ लाख टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व हंगामासाठी डाळींचे एकूण उत्पादन उद्दिष्ट २९९ लाख टन ठेवण्यात आले आहे. एकूण तेलबिया उत्पादनाचे उद्दिष्ट ४४७.५ लाख टन ठेवण्यात आले आहे.
