Latest Posts

दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

– शासनाने जाहिर केले होते एकुण १६ लाख रूपयाचे बक्षिस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६६८ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज ११ जूलै २०२४ रोजी दोन जहाल महिला माओवादी १) प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम (३६), रा. बोगाटोला (गजामेंढी), ता. धानोरा, जि. गडचिरोली व २) अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम, (३४), रा. मरकेगाव ता. धानोरा, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती –
१) प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई 
दलममधील कार्यकाळ –
– सन २००५ मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून सन २०११ पर्यंत कार्यरत.
– सन २०११-१४ मध्ये वैरागड दलममध्ये कार्यरत.
– सन २०१४-१५ मध्ये केकेडी (कुरखेडा, कोरची, देवरी) दलममध्ये कार्यरत.
– सन २०१५ मध्ये कंपनी नं. ०४ मध्ये बदली होऊन सन २०१८ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत.
– सन २०१८ मध्ये कंपनी नं. ०४ मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) म्हणून बढती होऊन सन २०२१ पर्यंत कार्यरत.
– सन २०२२ मध्ये डिके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये बदली होऊन पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर आजपावेतो कार्यरत.

कार्यकाळात केलेले गुन्हे –
आजपर्यंत एकुण ४० गुन्हे दाखल असून त्यामध्ये २० चकमक, ०२ जाळपोळ व १८- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

२) अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती 
दलममधील कार्यकाळ –
– सन 2010 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2013 पर्यंत कार्यरत.
– सन 2013-14 मध्ये प्लाटुन नं. 15 मध्ये सदस्य पदावर कार्यरत.
– सन 2014-15 मध्ये कंपनी नं. 04 मध्ये सदस्य पदावर कार्यरत.
– सन 2015 मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत.
– सन 2018 मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर बढती होऊन आजपावेतो कार्यरत.

कार्यकाळात केलेले गुन्हे –
आजपर्यंत एकुण ०७ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १२- चकमक, ०४- खून, व ०१- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे –
– दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.
– नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
– वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
– दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
– गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे.
– खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
– चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
– नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
– गडचिरोली जिल्ह्रात तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

शासनाने जाहिर केलेले बक्षीस –
– महाराष्ट्र शासनाने प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
– महाराष्ट्र शासनाने अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस –
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई हिला एकुण ०५ लाख हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती हिला एकुण ०५ लाख हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण २१ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व जसवीर सिंग, कमांण्डट ११३ बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

Latest Posts

Don't Miss