Latest Posts

हिमोफिलिया रुग्णांची उपचाराकरीता देशभरातून महाराष्ट्रात धाव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : हिमोफिलिया सारखा दुर्धर आजार झाल्यावर उपचारासाठी रुग्णांची चांगलीच धावपळ होत असली, तरी ठाणे सिव्हील रुग्णालय हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. रुग्णालयामार्फत वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्याने रुग्ण सर्वसामान्य जीवन जगत आहे. देशभरातून हिमोफेलिया रुग्ण उपचारासाठी महाराष्ट्रात येत असल्यामुळे त्यांच्या खर्चाचा मोठा बोजा आरोग्य विभागावर येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हिमोफिलिया हा एक दुर्मिळ, अनुवांशिक रक्त विकार आहे. वेळच्यावेळी औषध घेणे गरजेचे आहे. काही वेळा रक्तस्त्राव वाढत असल्यास तात्काळ इंजेक्शन घेणे क्रमप्राप्त आहे. सिव्हील रुग्णालय ही इंजेक्शन तात्काळ कशी उपलब्ध होतील. यासाठी अग्रक्रम दिला जातो. हिमोफिलियाग्रस्त विद्यार्थ्यांचे शिक्षणातील हुशारी बघून कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात हिमोफिलियाचे साधारण ७०० ते ८०० रुग्ण आहेत. हिमोफिलिया फेडरेशनच्या माध्यमातून उपचार घेणाऱ्या रुग्णांना सिव्हील रुग्णालयात हिमोफिलिया इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाते. हिमोफिलिया ग्रस्त विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश खूप मोठ आहे. ठाणे रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते दहावी व बारावीच्या १५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हिमोफेलिया केंद्र सुरु करण्यात आले असून सुमारे पाच हजार रुग्णांना हिमोफेलियाची इंजक्शन द्यावी लागतात. यासाठी सुमारे शंभर कोटीहून अधिक खर्च येत असून हा खर्च संपूर्णपणे आरोग्य विभागाकडून करण्यात येतो. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातही हिमोफेलियाच्या रुग्णांना फॅक्टर आठ व नऊ तसेच फिबा आदी इंजिक्शन देण्यात येत असले तरी आर्थिक भार हा आरोग्यविभागावरच येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या रुग्णांवरील आर्थिक तरतूद मोठी असून काही ठराविक कंपन्याच या औषधांचे उत्पादन करत असून अलीकडच्या काळात यातील काही कंपन्यांनी औषधांची किंमत वाढविल्यामुळे आरोग्य विभागावर याचा मोठा आर्थिक बोजा पडत असून मुंबई महापालिकेनेही यासाठी येणार्या खर्चाचा भार उचलला पाहिजे असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासनाने हिमोफेलिया केंद्र सुरु केले असले तरी अनेकदा रुग्णांना वेळेत औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होतात असे हिफोफेलिया सोसायटी ऑफ इंडियाचे म्हणणे आहे. मात्र ठाणे जिल्हा रुग्णालयात अनेकदा गुजरातमधील रुग्णही उपचारासाठी येतात व त्यांनाही ही इंजक्शने उपलब्ध करून दिली जातात. देशातील अनेक राज्यात हिमोफेलियाच्या औषधांचा पुरेसा साठा नसल्याने वेगवेगळ्या राज्यातून महाराष्ट्रात रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे त्याचाही आर्थिक भार आरोग्य विभागाला सहन करावा लागतो असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

भारतात आजघडीला हिमोफेलिया ऑफ इंडिया रजिस्ट्रीच्या नोंदीनुसार सुमारे ३० हजार हिमोफेलियाचे रुग्ण आहेत. तथापि अनेक राज्यात वैद्यकीय महाविद्यालयात हिमॅटॉलॉजी विषय सक्षम नसल्याने बहुतेक राज्यातून रुग्ण मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र या रुग्णांना जी औषधे/ इंजेक्शन द्यावी लागतात त्याचा खर्च आरोग्य विभागाला करावा लागतो. यासाठी हिमोफेलिया सोसायटी ऑफ इंडियाने उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यातील आरोग्य व वैद्यकीय शिक्षण सचिवांशी संपर्क साधून संबंधित राज्यात या रुग्णांसाठी योग्य ती व्यवस्था करावी यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे.

Latest Posts

Don't Miss