Latest Posts

तीन बिबटे जेरबंद, तरीही हल्ले कायम : दिवसाढवळ्या दुचाकीस्वारांवर झडप, नागरिक भयभीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मागील दहा दिवसांत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही बिबट्यांचा मुक्त संचार सुरूच आहे.

शुक्रवारी तब्बल बारा तासांत तीन बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्यात वन विभागाला यश आले असले तरी, अवघ्या २४ तासांतच शनिवारी पुन्हा दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी वन विभागाकडे आणखी पिंजरे लावण्याची आणि गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

पिंपरखेड आणि जांबुत परिसरात मागील आठवड्यात दोन दुर्दैवी घटना घडल्या होत्या. पिंपरखेड येथील शिवन्या बोंबे या चिमुरडीचा, तर जांबुत येथील ७० वर्षीय भागुबाई जाधव यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

या घटनांनंतर वन विभागाने बिबट्यांना नियंत्रित करण्यासाठी मोहीम हाती घेतली. शुक्रवारी (२४) दिवसभरात तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले असून, त्यांना माणिक डोह येथील निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे.

शेतकरी कचर महादू बोंबे यांच्या उसाच्या शेतात ६ ते ७ वर्षांचा नर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्याचवेळी पारगाव रोड परिसरात ४ वर्षांचा नर बिबट्या आणि दाभाडे मळा भागात ५ वर्षांची मादी बिबट्या जेरबंद झाली.

वन अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना सुरक्षितपणे हलविले. मात्र परिसरात बिबट्यांची संख्या २०० ते २५० असल्याचा अंदाज असल्याने पिंजरे अपुरे असल्याची टीका होत आहे.

दरम्यान, शनिवार, २५ रोजी दुपारी एक वाजता जांबुत येथील एचपी पंपाजवळ आणखी एक धक्कादायक प्रसंग घडला. विशाल जुन्नर पाटपेडीचे शाखा व्यवस्थापक गणेश गोसावी आणि लेखनिक कैलास बोरचटे हे दुचाकीवरून जात असताना ओढ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न केला.

प्रसंगावधान राखून त्यांनी दुचाकीचा वेग वाढवला व आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. क्षणभर उशीर झाला असता तर जीव गेला असता, असे त्यांनी सांगितले. या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांचा सवाल –
बेट भागातील उसाच्या शेतात आणि गावांच्या हद्दीत बिबट्यांचा मुक्त वावर सुरू आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर, आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी किती घटना घडल्याशिवाय वन विभाग जागा होणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यांनी अधिकाधिक पिंजरे लावण्याची आणि परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

वन विभागाचे प्रयत्न अपुरे? –
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्यांना नियंत्रित करण्यासाठी मोहीम सुरू आहे आणि आणखी पिंजरे लावले जाणार आहेत. मात्र, नागरिकांच्या मते विभागाची कार्यपद्धती संथ असून, उपाययोजनांबाबत गांभीर्याचा अभाव जाणवतो. वेळीच कठोर पावले न उचलल्यास हा खेळ आणखी जीवघेणा ठरू शकतो, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

दीर्घकालीन उपाययोजनांची गरज –
मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याने या भागात दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता भासत आहे. वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांशी समन्वय साधून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Latest Posts

Don't Miss