विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड टोळीवर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ अंतर्गत कलम लागू केले आहे. या टोळीतील एकूण १० गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सदर टोळीचे नेतृत्व चंद्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी आणि येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक यांनी केले असून, त्यांनी गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी संघटित गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्या होत्या. त्यांच्यासह मुकेश राजू वर्मा, अमित बालकृष्ण सोनकर, गौरिश श्रीनिवास कुसमा, अनवर अब्बास शेख व इतर साथीदारांविरुद्ध MCOCA अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी, शासकीय कामात अडथळा, मालमत्तेचे नुकसान, दरोड्याची तयारी, अग्निशस्त्रांचा बेकायदेशीर वापर, तसेच दहशत निर्माण करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली होती.
२० ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गंजवॉर्ड भागात टोळीवर कारवाई केली. या वेळी त्यांच्या ताब्यातून २ माऊझर पिस्तुले, २ देशी कट्टे, ३५ जिवंत काडतुसे आणि ४ धारदार खंजीर असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, ही टोळी दरोड्याद्वारे मिळालेल्या पैशांचा वापर करून खुनासारखे गंभीर गुन्हे करण्याच्या तयारीत होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य खून रोखण्यात यश आले.
सदर कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संपूर्ण ऑपरेशन चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पो.उप.नि. संतोष निंभोरकर, स.फौ. अरुण खारकर, पो.अं. गजानन नन्नावरे व मोक्का पथक यांनी पूर्ण केले.
