Latest Posts

बामणी येथे बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिने सह दोन लाख रुपयांची चोरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballapur): बल्लारपूर तालुक्यातील बामणी गावात घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख सोहेल शेख करीमुद्दीन (वय ३२) रा. वार्ड क्र. १, रोहीत सेवा, चर्चजवळ, बामणी  हे पत्नी, आई आणि दोन मुली सह राहतात.

३० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आपल्या आत्याचा मुलीच्या लग्नासाठी सर्व कुटुंबीय नातेवाईकांसह कारने तेलंगणा राज्यातील कागजनगर येथे गेले होते. त्यांनी घराचे मुख्य दरवाजाला तसेच समोरील गेटला कुलूप लावून बंद केले होते.

लग्नाचा कार्यक्रम आटोपून २ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता घरी परतल्यावर घराचे समोरील दरवाजाचे कुलूप गायब आढळले. संशय आल्याने त्यांनी मागील दरवाजातून आत प्रवेश केला असता घरातील दोन बेडरूम, स्वयंपाकघर आणि बैठक खोलीतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत दिसले.

यानंतर त्यांनी तत्काळ डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

घरातून ३७ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे ७७ हजार रुपये, ८७५ ग्रॅम चांदीचे दागिने किंमत अंदाजे ४२ हजार तआणि ८१ हजार रोख रक्कम असा एकूण सुमारे  दोन लाख रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.

सदर चोरीत सोन्याच्या अंगठ्या, कानातील दागिने, नथ, पायपट्ट्या, ब्रेसलेट तसेच घरात ठेवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादी शेख सोहेल यांनी पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे करीत आहेत.

Latest Posts

Don't Miss