विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune): राज्यातील लाखो डी.एड. आणि बी.एड. पदवीधर उमेदवारांनी दिलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीईटी-३) परीक्षेचा निकाल जाहीर होऊन आता सहा महिने उलटले आहेत. तथापि, या निकालानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया अजूनही सुरू न झाल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शासनाकडून अनेक वेळा आश्वासनं दिली गेली असली, तरी प्रत्यक्षात ठोस पावले उचलली जात नाहीत. यामुळे युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, शिक्षक भरती प्रक्रियेत होणारा विलंब आणि शासनाची उदासीनता उमेदवारांमध्ये निराशा निर्माण करत आहे. अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या काठावर पोहोचले असून, त्यांच्या करिअरवर गदा येण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा मोठा तुटवडा असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवणे कठीण होत आहे.
संघटनांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार कंत्राटी शिक्षकांच्या जागी कायम शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. कंत्राटी शिक्षकांच्या खांद्यावर शिक्षणाची जबाबदारी सोपविल्याने राज्याचा शैक्षणिक दर्जा सातत्याने घसरत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले, जर सरकारने लवकरात लवकर ठोस पावले न उचलली, तर सुशिक्षित बेरोजगार उमेदवार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
अब्दुल शेख, सामान्य अभियोग्यता धारक म्हणाले, पवित्र पोर्टलवरील दिरंगाई विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करत आहे. शासनाने तातडीने शिक्षक भरती सुरू करावी आणि सर्व पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
संघटनेने टीईटी पात्र उमेदवारांची कायम नियुक्ती करण्यात यावी आणि समूह शाळा धोरण रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, पवित्र पोर्टलवर होणारी दिरंगाई थांबवून, आश्रम शाळा आणि समाजकल्याण शाळांसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे.
