विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): जिल्ह्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करून त्यांना तेलंगाना राज्यात कत्तलीसाठी नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी यशस्वी कारवाई करत १७ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत एक पिकअप वाहनासह एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, मौजा बेबाळ (ता. मुल) येथून काही व्यक्ती पिकअप वाहनात जनावरांची तस्करी करून ती तेलंगाना येथे कत्तलीसाठी नेत आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी पोहोचले असता, एक संशयित चारचाकी पिकअप वाहन क्रं एम एच ३४ सी क्यू ०६९४ दिसले. वाहनाची तपासणी केली असता आत ५ जनावरे निर्दयतेने व दाटीने कोंबलेली, तसेच वाहनाखाली आणखी १२ जनावरे बांधलेली आढळली.
वाहनचालक समर्थ नागेश पुप्पलवार (२१), रा. बेबाळ यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले सहकारी स्वप्निल फुलझेले रा. एरगाव, मुन्ना शामराव मुद्रिक रा. बेबाळ, अशपाक कुरेशी व रहमान कुरेशी रा. गोंडपिपरी यांच्या मदतीने ही वाहतूक केल्याचे सांगितले.
या कारवाईत १७ जनावरे किंमत अंदाजे १ लाख ७० हजार रुपये आणि पिकअप वाहन किंमत अंदाजे ५ लाख रुपये असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. विनोद भुरले, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुरेंद्र महतो, पोअ. प्रदीप मडावी, अजीत शेन्डे, प्रफुल्ल गारघाटे व नितेश महात्मे यांच्या पथकाने केली.
