विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था /कोची (Kochi) : पतीने विनाकारण पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे हा गंभीर मानसिक अत्याचार असल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशा वर्तनामुळे वैवाहिक जीवन नरकासमान बनते, असे मत न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि एम. बी. स्नेहलता यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.
महिलेच्या घटस्फोट याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, वैवाहिक नाते हे परस्पर विश्वास, प्रेम आणि सन्मानावर टिकते. परंतु, या जागी संशय आला की पती-पत्नीचे नाते अर्थहीन होते. सर्वोच्च न्यायालयातील व्ही. भगत विरुद्ध डी. भगत या प्रकरणाचा दाखला देत केरळ उच्च न्यायालयाने संबंधित महिलेचा घटस्फोट अर्ज मंजूर केला.
न्यायालयाने स्पष्ट केले की, पतीकडून पत्नीवर वारंवार संशय घेणे, तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करणे यामुळे तिची मानसिक शांतता व आत्मसन्मान दोन्ही धोक्यात येतात. अशा परिस्थितीत पत्नीने असे वैवाहिक नाते टिकवावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. न्यायालयाने अधोरेखित केले की, तिलाही स्वतंत्रपणे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.
पूर्वी जिल्हा न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती, मात्र उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. न्यायालयाने म्हटले की, विश्वास संपला की विवाह हे नाते एक ओझे बनते.
ही घटना २०१३ मधील असून या जोडप्याचा विवाह त्या वर्षी झाला होता. विवाहानंतर पत्नी नर्स म्हणून कार्यरत होती, तर पती परदेशात नोकरी करत होता. पतीने तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले आणि परदेशात नोकरीची सोय करून देण्याचे आश्वासन दिले.
पत्नीने पतीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून नोकरी सोडली आणि त्याच्यासोबत परदेशात गेली. मात्र, त्यानंतर पतीचे वर्तन संशयी व त्रासदायक झाले, त्यामुळे पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली.
