Latest Posts

एसटी महामंडळाच्या सौर ऊर्जा हब प्रकल्पामुळे होणार १ हजार कोटी रुपयांची बचत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai): राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळ आपल्या मालकीच्या जागांवर सौर ऊर्जा हब उभारणार आहे. या प्रकल्पाद्वारे एसटी महामंडळाला ३०० मेगावॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य आहे, ज्याची वार्षिक किमत १ हजार कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे. यामुळे एसटी स्वावलंबी होईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली.

महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी सांगितले की, एसटीच्या मालकीच्या जागांवर खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून विविध विकास प्रकल्प राबवले जातील. त्यामध्ये उरलेल्या जागांमध्ये सौर ऊर्जा निर्मिती केली जाईल. सध्या एसटीला दैनंदिन वापरासाठी १५ मेगावॅट वीज लागते, ज्यासाठी महावितरणला २५ ते ३० कोटी रुपये बिल भरावे लागते.

वृद्धीशील गरजा आणि बचत –
भविष्यात इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी सुमारे २८० मेगावॅट विजेची आवश्यकता भासणार आहे. जर ही वीज सौर उर्जेच्या माध्यमातून निर्मित केली गेली, तर एसटीला १ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

स्वावलंबनाचा दिशेकडे महामंडळाची वाटचाल –
एसटी आपल्या मालकीच्या जागांचा वापर करून सौर ऊर्जा हब प्रकल्प उभारणार आहे. तसेच, ओसाड जमिनींवर शासनाकडून नाममात्र भाड्यावर जागा घेतली जाईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे या प्रकल्पासाठी आर्थिक मदत मिळवली जाईल, ज्यामुळे एसटीला आर्थिक अनुदानासाठी वेळोवेळी शासनाकडे हात पसरावे लागणार नाही, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

Latest Posts

Don't Miss