– जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): सैनिकोत्सव २०२५–२०२६ च्या पहिल्या सत्रातील क्रीडा स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा विद्यालयात अत्यंत आनंद, उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे सर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मनोगत दिले. ते म्हणाले क्रीडा म्हणजे फक्त जिंकणे नव्हे, तर प्रामाणिक प्रयत्न, शिस्त आणि सहकार्य यांचे सुंदर प्रतीक आहे. शाळा हे आपल्याला बरेच काही शिकविते क्रीडा सुद्धा असेच आहे क्रीडा ही केवळ खेळ नाही, ती जीवनाची खरी शाळा आहे.
मैदानावर खेळताना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, परिश्रम, सहकार्य आणि आत्मविश्वास विकसित होतो. विजय मिळवणे हेच सर्वस्व नाही; प्रामाणिकपणे आणि निष्ठेने खेळणे हेच खरे यश आहे. राष्ट्रीय स्तरावर स्वत हँडबॉल खेळाचे प्रतिनिधित्व करणारे घटाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
घटाळे पुढे म्हणाले खेळ आपल्याला शिकवतो की पराभव हा शेवट नसतो, तर तो नव्या प्रयत्नांची सुरुवात असतो. जीवनात प्रत्येकाने खेळाडूप्रमाणेच संघर्ष करत पुढे जाण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. विजयी तोच, जो स्वतःवर विश्वास ठेवतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय भास्कर घटाळे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक अजय वानखडे, क्रीडा प्रमुख भूपेंद्र चौधरी, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी, हरिप्रसाद ध्यानी, आणि पालक प्रतिनिधी सौ.फेब्रुलवार, सौ.परसा आणि सौ.देवारे व विद्यालयाचा कॅप्टन आकाश टेकाम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बलदेवता हनुमानजी यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलनव माल्यार्पण करून आणि सामूहिक वंदे मातरम् गायनाने झाली. यानंतर चारही हाउस च्या विद्यार्थ्यांनी केलेली भव्य मार्चपास्ट, सलामी आणि ध्वजारोहण सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. ओमप्रकाश संग्रामे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, क्रीडा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहेत. क्रीडा विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास शिकवते. यावेळी प्राचार्यांनी नवी मुंबई येथे झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक भारताने पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक कसा जिंकला याचा उल्लेख आवर्जून केला जिद्द आणि चिकाटी असेल तर सारे शक्य असते असे मत व्यक्त केले.
पर्यवेक्षक अजय वानखडे सर यांनी प्रास्ताविक वाचन केले व विद्यार्थ्यांच्या खेळातील उत्साही सहभागाचे कौतुक केले व सर्वांना क्रीडासंस्कार जोपासण्याचे आवाहन केले. उद्घाटन सोहळ्यानंतर मैदानावर विविध स्पर्धांचा थरारक प्रारंभ झाला. धावणे, लांबउडी, गोळाफेक, खो-खो, कबड्डी, खो खो, वोली बाल, बास्केटबॉल, रीले, रस्सा खेच, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक, बुद्धिबळ कॅरम, रायफल शुटींग इत्यादी क्रीडा प्रकार विद्यालयात खेळल्याजाणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील प्रा. डॉ. राकेश चडगुलवार, यांनी तर आभार रवींद्र कोरे यांनी केले.
