विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / बीड (Beed): शहरातील रिंगरोडवरील मानवलोक कार्यालयाजवळ गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपचारासाठी नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची ओळख चंद्रकांत मुरलीधर गंगणे (वय ५२, रा. राडी, ता. अंबाजोगाई) अशी झाली आहे. ते अंबाजोगाई येथील त्यांच्या घराकडे जात असताना हा अपघात घडला. गंगणे हे रांजणी येथील साखर कारखान्यात चीफ केमिस्ट म्हणून कार्यरत होते.
घटनेच्या बाबत अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी अपघाताची तपासणी सुरू केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. चंद्रकांत गंगणे यांच्या मृत्यूची बातमी ऐकून राडी गावावर शोककळा पसरली आहे.
