Latest Posts

कळमन्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा शेकडो रुपयांनी कमी दर : शेतकरी निराश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ३०) सोयाबीनला दर्जानुसार प्रतिक्विंटल अवघा ३ हजार ३०० ते ४ हजार २५० रुपयांदरम्यान भाव मिळाला. हा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असून बाजारात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारने जाहीर केलेला हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार १४० रुपये असताना प्रत्यक्षात मिळणारा दर त्यापेक्षा शेकडो रुपयांनी कमी आहे.

अतिवृष्टीमुळे दर्जा निकृष्ट –
या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी बाजारात येणाऱ्या सोयाबीनला डाग पडले असून, दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापारी कमी दर देत आहेत.

सरकारी खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने अडचण –
राज्य सरकारकडून सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे. व्यापारी मनमानी दर ठरवत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार असून, हमीभावापेक्षा जास्त दर मिळावा, नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी आणि सरकारी खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करावीत, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे.

खर्च वाढला, उत्पादन घटले – शेतकरी अडचणीत –
यंदा शेतकऱ्यांच्या एकरी सरासरी अडीच ते तीन क्विंटलच उत्पादन मिळाले. लागवडीसाठी एकरी १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च आला. सध्याच्या भावात तो खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

दरवर्षी खते, मजुरी आणि इंधनाचे दर वाढतात; पण सोयाबीनचा भाव मात्र तसाच राहतो. त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हंगामात सोयाबीन लागवड करायची की नाही, या संभ्रमात आहेत.

हंगाम लवकर संपण्याची शक्यता –
नागपूर जिल्ह्यातील कुही, मांडळ, उमरेड, पारशिवनी आणि मौदा तालुक्यांमध्ये सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र अतिवृष्टीमुळे पीक कमी आले. परिणामी, यंदा कळमन्यातील सोयाबीन हंगाम तीन आठवड्यांतच संपेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर शेतकऱ्यांच्या नाराजीचे वारे आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

दर कोसळल्याने आर्थिक गणित बिघडले –
दोन दिवसांपूर्वी कळमन्यात सोयाबीनचा दर ४ हजार ४६० रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर पुन्हा भाव कोसळून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. सध्या बाजारात दररोज २ ते २.५ हजार पोत्यांची आवक होत असून, गुणवत्तेच्या अभावामुळे दर घसरले आहेत.

यंदा हंगाम पुढील १५ ते २० दिवसांत संपेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी दररोज ५ ते ६ हजार क्विंटल आवक, तर काही वर्षांपूर्वी १० हजार क्विंटलपर्यंत आवक होत होती. मात्र यंदा गुणवत्तेअभावी सोयाबीनला भाव मिळत नसल्याचे धान्य बाजार असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss