विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मलठण (शिरूर) : पिंपरखेड येथे रविवारी झालेल्या बिबट्या हल्ल्यातील मृत्यू आणि त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको, जाळपोळ आंदोलनानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी विशेष शार्पशूटर्स पथक पिंपरखेड येथे दाखल झाले असून, डॉ. चंद्रकांत मंडलिक, झुबीन तैहमुर पोस्टवाला आणि विनोद सोनावळे यांच्या नेतृत्वाखालील या तज्ज्ञ टीमने बिबट्याच्या शोधमोहिमेला सुरुवात केली आहे.
या विशेष पथकाकडे ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचा मागोवा घेण्याची साधने उपलब्ध आहेत. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले की, पिंपरखेड येथे आठ आणि जांबुत येथे चौदा पिंजरे बसवण्यात आले असून, आवश्यकता भासल्यास आणखी वाढवले जातील. मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशानुसार बिबट्या दिसताच गोळीबार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, पकडलेल्या बिबट्यांना जवळच्या जंगलात सोडल्यामुळे ते पुन्हा गावात परत येतात, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात जागा संपल्याने पुनर्वसनाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत.
बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याने पिंपरखेड व परिसरातील नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या आहेत. यात जि. प. पिंपरखेड, कोयमहालेवस्ती, ढोमेमळा, दाभाडेमळा, गाजरेझाप, चांडोह (दुपारनंतर), माध्यमिक विद्यालय पिंपरखेड, जांबुत आणि वडनेर खुर्द या शाळांचा समावेश आहे.
शिक्षक उपस्थित असूनही विद्यार्थी येत नसल्याने शाळा बंद राहिल्या, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी के. बी. खोडदे यांनी दिली. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, बिबट्याचा शोध लवकरच लागेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
