विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नंदुरबार (Nandurbar): अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ आज (रविवार) दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील धोकादायक वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम शाळेचे हे विद्यार्थी दिवाळीच्या सुट्ट्यानंतर शाळेत परतत होते. बसमध्ये विद्यार्थी भरलेले असताना तीव्र उतारावर चालकाचा तोल सुटल्याने बस दरीत कोसळली. या घटनेत काही विद्यार्थी बसखाली दबले गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
तत्काळ मदतकार्य सुरू –
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रस्त्यावर पूर्वीही छोटे अपघात घडले असले तरी, गेल्या दोन महिन्यांत हा दुसरा मोठा अपघात असल्याने रस्त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
