– १.२५ लाख लिटर इथेनॉलचा साठा धोक्यात – आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): ब्रम्हपुरी येथील रामदेव बाबा सॉल्व्हेंट्स कंपनीमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागली. कंपनीमधील डिस्टिलेशन प्लांटमध्ये आग लागून जवळपास १ लाख २५ हजार लिटर इथेनॉलचा साठा धोक्यात आला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक कर्मचारी बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळी तात्काळ ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही आणि मूल येथील अग्निशामक दल दाखल झाले. दरम्यान परिस्थितीचा वाढता धोका लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून दोन फायर ब्रिगेड पथकेही घटनास्थळी पोहोचली आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेकडून दोन फायर टेंडर फोम सोल्यूशनसह रवाना करण्यात आली.
डिस्टिलेशन प्लांटमध्ये असलेल्या ज्वलनशील रसायनांमुळे आग वेगाने पसरली असून अग्निशामक दलाला ती नियंत्रित करण्यात अडचणी येत आहेत. तरीही सर्व पथके संयुक्तरीत्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
घटनास्थळी स्थानिक पोलीस व प्रशासन सतर्क राहत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सध्या तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची नोंद नाही आहे.
