Latest Posts

राजुरात दिवसाढवळ्या ३ लाखांची चोरी : चोरट्यांनी वडिलांचे लक्ष विचलित करून केली कौशल्यपूर्ण लूट

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): राजुरा शहरात दिनदुपारी घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बँकेतून नुकतीच काढलेली तीन लाख रुपयांची रक्कम दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलच्या डिकीतून चोरून नेल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत दिनकर कावळे रा. वार्ड क्र. २, रामपूर, ता. राजुरा हे आपल्या वडिल दिनकर पांडुरंग कावळे यांच्यासह बँक ऑफ इंडिया, राजुरा शाखेत पेंशनची रक्कम काढण्यासाठी आले होते. त्यांनी वडिलांच्या खात्यातील तीन लाख रुपयांचा धनादेश वटवून ती रक्कम परिवार फॅशन असे लिहिलेल्या पिवळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवली होती. ही पिशवी त्यांनी आपल्या हिरो पॅशन प्रो क्रं एम एच ३४ ए जे ३७६५ मोटारसायकलच्या रॅग्झीन डिकीत ठेवली.

यानंतर ते दोघेही अर्बन बँकेत आर.डी. भरण्यासाठी गडचांदूर रोडने गेले. प्रशांत कावळे बँकेत गेले असता त्यांच्या वडिलांना दोन अनोळखी व्यक्ती मोटारसायकलवर दिसले. त्यापैकी एका व्यक्तीने काही अंतरावर काहीतरी पडले आहे असा इशारा देत वडिलांचे लक्ष विचलित केले. काही क्षणांतच दोन्ही अनोळखी व्यक्ती तेथून गायब झाले.

प्रशांत कावळे बँकेतून परत आल्यावर त्यांनी डिक्की उघडून पाहिली असता आत ठेवलेली तीन लाख रुपयांची रक्कम गायब असल्याचे आढळले. त्यांनी परिसरात चोरट्यांचा शोध घेतला, मात्र ते कुठेच आढळले नाहीत.

या प्रकरणी कावळे यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दोन अनोळखी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे राजुरा शहरात दिवसाढवळ्या वाढलेल्या चोरीच्या प्रकारांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते करीत आहे.

Latest Posts

Don't Miss