विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक – २०२४ च्या अनुषंगाने ७०- राजूरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी ८, १२ व १८ नोव्हेंबर २०२४ ला करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम ७७ मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार प्रथम खर्च लेखा तपासणी शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी मंगळवार १२ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी सोमवार १८ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, राजुरा येथे करण्यात येईल.
७० – राजुरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे वरील दिनांकास व वेळेस उपविभागीय कार्यालय सभागृह, राजूरा येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपाासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे राजुराचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र माने यांनी कळविले आहे.
