विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / सांचोर (राजस्थान) : राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एक महत्त्वाची कारवाई करत सांचोर येथील मौलवी ओसामा उमर याला अटक केली आहे. हा मौलवी थेट अफगाणिस्तानमधील कुख्यात दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी जोडलेला होता.
एटीएसने दावा केला आहे की, ओसामा उमर देशभरात कट्टरपंथी विचार पसरविण्याच्या एका मोठ्या कटात सामील होता. त्याच्या अटकेमुळे सीमावर्ती भागातील दहशतवादी नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानात पळून जाण्याची योजना: दुबईमार्गे गाठणार होता तालिबान –
बाडमेर जिल्ह्यातील मुसनाराई का बास येथील मूळ रहिवासी असलेला ओसामा उमर साचोर येथील इमाम नूर मोहम्मद मोहर्रम चौकात राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो देशविरोधी कृत्ये करत असल्याच्या संशयावरून एटीएसने त्याची तपासणी सुरू केली.
एटीएसच्या तपासात उघड झाले की, ओसामा उमर गेल्या चार वर्षांपासून इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून तहरीक-ए-तालिबानच्या टॉप कमांडर्सशी थेट संपर्क साधत होता. त्याने देश सोडून अफगाणिस्तानात पळून जाण्याची योजना आखली होती आणि तो दुबईमार्गे तेथे गाठण्याच्या तयारीत होता. मात्र, एटीएसने त्याच्या योजनेला उधळून लावले आणि त्याला पळून जाण्याआधीच ताब्यात घेतले.
संशयितांची चौकशी: कट्टरता पसरवण्याचा प्रयत्न –
गेल्या शुक्रवारी, एटीएसने राजस्थानमधील चार जिल्ह्यांत एकाच वेळी छापे टाकले, ज्यात पाच संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये दोन सख्खे भाऊही होते. जयपूर येथील एटीएस मुख्यालयात चौकशी झाल्यावर, ओसामा उमरवर गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएसचे अतिरिक्त महासंचालक एम.एन. दिनेश यांनी सांगितले की, ओसामा उमर अन्य संशयितांना कट्टर बनवण्याचा आणि त्यांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होता.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, ओसामा उमर जिहादी विचारांनी प्रेरित होता आणि त्याने युवकांना याच विचारांनी प्रभावित करण्याचे प्रयत्न केले. त्याच्याकडून दोन फोन जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या इतर संशयितांची (मसूद, मोहम्मद अयूब, मोहम्मद जुनैद आणि बसीर) चौकशी सुरू आहे. सध्याच्या तपासानुसार, हे संशयित भारताबाहेरच्या दहशतवादी नेटवर्कशी थेट संबंधित नसल्याचे समोर आले आहे.
दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश सुरूच –
एटीएस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मौलवी ओसामा उमरच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहे. त्याच्या अटकेमुळे राजस्थानच्या सीमावर्ती भागातील दहशतवादी नेटवर्कच्या वाढीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
