विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने देशातील नामांकित उच्च शैक्षणिक संस्थांमध्येउच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसुचित जाती नवबौध्द विद्यार्थ्यांकडून २६ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभा घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील असावा व तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्यांच्या कुंटूंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयापेक्षा कमी असावे. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्ष इतकी असेल. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असला पाहिजे. तथापि त्यापुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करु शकतील परंतु विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास करण्यात येईल. विद्यार्थी १० वी व १२ परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता १२ वीच्या परीक्षेमध्ये किमान ५५टक्के गुण मिळविणे आवश्यक राहिल व थेट व्दितीय वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना डिप्लोमामध्ये ५५ टक्के गुण आवश्यक राहील. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ५५ टक्के गुण असावेत. शिष्यवृत्ती देशपातळीवरील मान्यताप्राप्त संस्थामधील अभ्यासक्रमासाठी लागू राहील. संस्थाची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा अंतिम अधिकार शासनास राहणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
लाभाचे स्वरुप –
शैक्षिणिक संस्थेने ठरवून दिलेले पुर्ण शैक्षणिक शुल्क, परीक्षा शल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक शुल्क, डेव्हलपमेंट फी इत्यादी देण्यात येईल. शैक्षणिक संस्थेतील वसतीगृह व भोजन शुल्क याचा त्यांच्या आकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल. शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहात जागेअभावी प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले वसतीगृह व भोजन शुल्क देण्यात येईल. वसतीगृहात न राहणा-या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेप्रमाणे निवार्हभत्ता देण्यात येईल. प्रवेशित अभ्यासक्रमासाठी लागणा-या पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे एकुण १० हजार रुपये प्रत्येक वर्षी देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरुन अर्ज उपलब्ध करुन घेऊन परिपूर्ण आवश्यक कागदपत्रासह २६ऑगस्ट पर्यंत पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड पुणे येथे सादर करावा अर्जाच्या पॉकिटावर देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना असा ठळक उल्लेख करण्यात यावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.
